नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने माजी कर्णधार एमएस धोनीसोबतच्या वादावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धोनी सोबत असलेल्या वादाच्या अफवांवर त्याने स्पष्टपणे भाष्य केले आहे.
गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांच्यातील वादाच्या बातम्या वारंवार येत असतात. 2011 च्या विश्वचषक दरम्यानच्या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या 91 धावा आणि विश्वचषक जिंकून दिलेल्या त्या षटकारावर गंभीरने केलेल्या वक्तव्यामुळे तो धोनीवर खूश नसल्याचे लोकांना वाटले.
‘ओव्हर अँड आउट’ या यूट्यूब शोमध्ये गौतम गंभीरने एमएस धोनीसोबत झालेल्या वादाच्या बातम्यांबाबत वक्तव्य केले होते. तो म्हणाला, “मला एमएस धोनीबद्दल खूप आदर आहे आणि नेहमीच असेल. मी ते ऑन एअर कॉल केले आहे आणि तुमच्या चॅनलवरही सांगत आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा मी 138 कोटी लोकांसमोर कुठेही बोलू शकतो. मला आशा आहे की त्याची कधीच गरज भासणार नाही पण गरज पडली तर मी आधी धोनीच्या पाठीशी उभा राहीन. कारण त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे.आमच्यात मतभिन्नता असू शकते. खेळाबद्दल माझे वेगळे मत असू शकते आणि त्याचे मत वेगळे असू शकते. खरे तर एमएस धोनी कर्णधार असताना मी बराच काळ उपकर्णधार होतो. महेंद्रसिंग धोनी ज्या प्रकारचा क्रिकेटर आहे त्याबद्दल मला खूप आदर आहे.”
गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेक मुद्द्यांवर तो आपले मत उघडपणे मांडताना दिसतो.