मुंबई : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरलेला पाहायला मिळाला. आता गंगुबाईची जादू फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील पहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी पाकिस्तानमधील एका अभिनेत्याने चक्क पूर्ण थिएटरच बुक केले असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेता मुनीब बट्टने आपल्या पत्नीसोबत चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी त्याने हे केले असल्याचे म्हटले जात आहे. कारण मुनीबची पत्नी आयमान खान ही आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे. अभिनेत्याच्या या कृतीने भारतातील आलिया भट्टचे चाहते खूप खुश झाले आहे.

दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने १२३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण आणि विजय राज यांनीही अप्रतिम काम केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांनी केले आहे.