मुंबई : काही दिवसांपूर्वी एका कार अपघातात अभिनेत्री मलायका अरोरा जखमी झाली होती. यानंतर चाहत्यांना मलायकाच्या तब्येतेची काळजी वाटत होती. या सर्वानंतर आता मलायका बरी झाल्याचे दिसून येत आहे. मलायकाने सोशल मीडियावर अपघातानंतर तिची पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी सतत संवाद साधणारी मलायका अपघातानंतर सोशल मीडियापासून दूर होती. मात्र, अपघातानंतर आज पहिल्यांदाच तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यात तिने स्वतः चा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘पूर्वी झालेला अपघात एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हता. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना अविश्वसनीय आहेत.’ यासोबतच अपघाताच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे तिने या पोस्टमध्ये आभार मानले आहेत.

दरम्यान, अपघाताच्या वेळी मलायका अरोरा तिच्या रेंज रोव्हर कारमध्ये होती, तेव्हा हे वाहन दोन कारमध्ये अडकले आणि त्यांची धडक झाली होती. अपघातानंतर मलायका अरोराला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आला असतानाही तिला रुग्णालयातच रात्रभर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलायकाला डिस्चार्ज देण्यात आला.