Flex Fuel Car : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार लॉन्च केली असून, ही कार इथेनॉलवर चालते. जाणून घ्या या कारबद्दल.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिली फ्लेक्स-इंधन (Flex Fuel Car) कार लॉन्च केली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर या कारकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ही गाडी आल्यानंतर आता लोकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणण्याचाही केंद्र सरकारचा मानस आहे.

ही कार भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर लोकांना याचा लाभ मिळेल कारण ती अतिशय स्वस्त आणि किफायतशीर असेल, तसेच पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरेल. टोयोटाने ही कार भारतात एक पायलट प्रोजेक्ट अंतर्गत फ्लेक्सी-इंधन मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने म्हणून लॉन्च केली आहे.

इथेनॉल कसे तयार केले जाते?

फ्लेक्स-इंधन वाहने इथेनॉलवर चालत असताना, ऊस साखर आणि कॉर्न सारख्या घटकांपासून इथेनॉल (Ethanol) शाश्वतपणे तयार केले जाते. त्यामुळे विदेशी तेल विकत घेण्यासाठी इथेनॉल हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय देशातील शेतकऱ्यांना उसाला रास्त भाव मिळण्यास मदत होणार आहे.

इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले जात आहे, त्याची किंमत 60-62 रुपये प्रति लीटर आहे, तर देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्याचा वापर लोकांना प्रति लिटर 30-35 रुपये मोजावा लागेल.

हे तंत्रज्ञान काय आहे?

पेट्रोलमध्ये इथेनॉल किंवा मिथेनॉल मिसळून फ्लेक्स इंधन तयार केले जाते. फ्लेक्स फ्युएल कारचे इंजिन दोन किंवा अधिक इंधनांवर चालवायचे असेल तर त्यात काही तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे. हे इंजिन पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवरही चालू शकते. कॅनडा, अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये या तंत्रज्ञानावर चालणारी वाहने वापरली जात आहेत.