नवी दिल्ली : ब्रिटिश-आयरिश बॉय बँड ‘द वाँटेड’ मधील एक गायक टॉम पार्कर याचे निधन झाले आहे. अवघ्या 33 व्या वर्षी या गायकाने जगाचा निरोप घेतला. टॉम पार्करच्या मृत्यूचे कारण ब्रेन ट्यूमर असल्याचे सांगितले जात आहे. टॉमच्या मृत्यूची पुष्टी त्याची पत्नी केल्सी हार्डविक हिने Instagram द्वारे केली. ही दुःखद माहिती समोर आल्यानंतर सेलेब्ससह गायकाचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत.
टॉम पार्करच्या मृत्यूबद्दल माहिती देताना, त्याची पत्नी केल्सीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर टॉमचा एक कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “टॉमचे आज सकाळी (३० मार्च) कुटुंबियांच्या उपस्थितीत निधन झाले. आम्ही दु:खी आहोत आम्ही त्याच्या उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू.”
टॉम आणि केल्सीचे लग्न 2018 मध्ये झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले, त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ऑक्टोबर 2020 मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती पण अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.