rohit sharma
मोठ्या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज, म्हणाला...

नवी दिल्ली : लखनऊ येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने इशान किशन, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाचे कौतुक केले. पण, खराब क्षेत्ररक्षणावर त्याने संताप व्यक्त केला.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, “मी इशानला चांगले समजतो. त्याला सतत शॉट्स घेणे आवडते. त्याला दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी करताना पाहून आनंद झाला. जडेजाच्या पुनरागमनामुळे आनंदी आहे. मला त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे, म्हणून त्याला फलंदाजीसाठी पाठवले आणि पुढच्या सामन्यांमध्ये ते तुम्हाला दिसेल. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वापर करू इच्छितो.”

रोहित पुढे म्हणाला, “या सामन्यात आम्ही काही सोपे झेल सोडले, ज्याची या स्तरावर अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मला वाटते की आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही त्यावर काम करतील. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात आम्हाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनायचा आहे.”

श्रीलंकेच्या डावाच्या तिसऱ्या षटकात व्यंकटेश अय्यरने कमल मिसाराला बाद केले आणि सहाव्या षटकात श्रेयस अय्यरने चरित असालंकाचा एक सोपा झेल सोडला. यानंतर जसप्रीत बुमराहनेही झेल सोडत असलंकाला जीवदान दिले.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 199 धावा केल्या. ज्यामध्ये इशान किशनने 89 आणि श्रेयस अय्यरने नाबाद 57 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 6 गडी गमावून 137 धावाच करू शकला.