‘एमआयएम’ व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यासंबंधी राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी प्रतिकूल मते व्यक्त केली तर शिवसेनेकडून खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

तरीही औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मागे हटायला तयार नाहीत. आपला हा प्रस्ताव घेऊन आपण एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

पवार आणि ठाकरे यांची भेट घेऊन आपण एकदा आपलं नेमकं मत त्यांच्या कामावर घालणार आहोत, असं जलील म्हणाले. मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले, मुख्यमंत्री कोणत्या राजकीय पक्षाचे असू शकत नाही.

आपण चर्चा तर करु. तुम्ही कधीपर्यंत फक्त हिंदुत्ववादी म्हणत राहणार आहात. भाजप-सेनेच्या या लढाईमुळे देश कुठे चाललाय? देशाचा विचार करणार की फक्त हिंदुत्वाचा जप करणार आहात?

राज्यातल्या दुसऱ्या समाजाचे आपण मुख्यमंत्री नाहीत का? मुख्यमंत्र्यांच्या एका नकारामुळे आम्ही हार मानलेली नाही. कळीचे मुद्दे घेऊन राजकारण करणं हा राजकीय पक्षांचा धंदा झालेला आहे.

यातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे, हाच विचार घेऊन आपण पवार आणि ठाकरे यांना भेटणार आहोत,’ असंही जलली म्हणाले.