नवी दिल्ली : IPL 2022, ची सुरुवात 26 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. मात्र, खेळाडूंना मैदानात उतरवण्यापूर्वी बीसीसीआय त्यांच्या केंद्रीय करारातील खेळाडूंच्या फिटनेसकडेही लक्ष देऊन आहे. हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंनी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिटनेस चाचणी दिली आहे.
हार्दिक पांड्या यो-यो चाचणीत उत्तीर्ण झाला आहे. पण, लाजिरवाणी गोष्ट म्हणजे 22 वर्षीय युवा खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ यो-यो चाचणीत नापास झाला आहे. तथापि, यो-यो चाचणीत फेल झाला तरी त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या दुखापतीवर तसेच तंदुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी एनसीएमध्ये शिबिर आयोजित केले होते आणि त्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचे देखील नाव समाविष्ट आहे.
पृथ्वी शॉ सध्या केंद्रीय कराराचा भाग नाही, परंतु त्याच्या फिटनेसबाबत अपडेट देण्यासाठी एनसीएने बोलावले होते. यो यो चाचणीत युवा खेळाडूचे अपयश अत्यंत निराशाजनक आहे आणि त्यामुळेच चाहते पृथ्वी शॉला प्रचंड ट्रोल करत आहेत.यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी फक्त 16 गुण आवश्यक आहेत आणि पृथ्वी केवळ 15 गुणांपर्यंत पोहोचू शकला आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्ताला सांगितले, “हे फक्त फिटनेस अपडेट्स आहेत. अर्थात, यामुळे पृथ्वीला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यापासून रोखता येणार नाही. हे फक्त फिटनेस पॅरामीटर आहे आणि याचा अर्थ असा नाही की सर्व काही संपले आहे.”