देशातील विधानसभा निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा समावेश आहे.

या पोटनिवडणुकीचे विशेष म्हणजे करुणा शर्मा-मुंडे यांनीही ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या मला जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.

आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून, त्यातून अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात २५ वर्षांची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्यांसह लग्नाचे फोटोही असतील.

हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झाले आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

तसेच धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला.

पुढे त्यांनी म्हटलं की, “त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही”.