झोमॅटो या घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीने एप्रिलपासून दहा मिनिटांत डिलिव्हरीची सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. यातून ग्राहकांची सोय आणि कंपनीचाही फायदा होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र यासंबंधी काळजी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात.

१० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीनं डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.

’ झोमॅटोनं गेल्यावर्षी बेंगळुरूमध्ये १५ मिनिटांत डिलिव्हरी देण्याचा उपक्रम राबविला होता. आता १० मिनिटांत सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असून याची सुरवात दिल्लीजवळ गुरुग्रामपासून केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं असे प्रयोग सुरू असले तरी यामध्ये ज्यां मार्फत ही सेवा पुरविली जाणार आहे त्या डिलिव्हरी बॉयकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं आहे.