Dasara Melava : (Dasara Melava) महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर हा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कुणाच्या सभेसाठी गर्दी जमा होते त्यासंदर्भात चढाओढ होती.

दरम्यान या दसऱ्या मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असे चर्चासत्र जोरदार रंगले होते. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीचे आरोप करत बाप पाळवणारी टोळी म्हणून टीका केली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केलीत आम्ही नाही असा टोला लगावला आहे.

आनंद दिघे यांचे पाय उद्धव ठाकरे यांनीच कापले असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे तर, दाऊदचा हस्तक होण्याऐवजी मोदींचे हस्तक होणे पसंत करू असे टीकास्त्र शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरने यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कट्ट्पा म्हणत हिणवलं.

दरम्यान, या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक (Shivsena) उपस्थित होते. मात्र नक्की कोणाच्या सभेला जास्त कार्यकर्ते उपस्थित राहिले यावरून चढाओढ सुरु आहे. शिवाजी पार्कवर एक लाख लोकांची गर्दी जमली असल्याचा दावा काहीजणांकडून करण्यात आला आहे तर बीकेसी मैदानावर दोन लाखांची गर्दी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पण शिवाजी पार्कची क्षमता 55 ते 60 हजार लोकांची असून पोलिसांच्या अंदाजानुसार काही लोकं मैदानात तर काहीजण मैदानाच्या बाहेर थांबलेले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर 65 हजारांच्या आसपास लोकं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या सभेला दोन ते तीन लाख लोक तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अडीच लाख लोकांच्या उपस्थितचा अंदाज तेथे आलेल्या कार्यकर्त्यांनी लावला आहे