पांढरे सोने यंदा शेतकऱ्यांना तारणार…! कापसाला सध्या काय भाव मिळतोय ? भविष्यात भाव वाढणार का? वाचा सविस्तर
Cotton Price : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याला शेतकरी बांधव पांढरे सोने म्हणून ओळखतात. नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून तात्काळ पैसा उपलब्ध होतो. हेच कारण आहे की राज्यातील मराठवाडा, विदर्भ खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
खांदेशात कापसाची सर्वाधिक लागवड होते. येथील बहुतांशी शेतकरी बांधव कापूस पिकावरच अवलंबून आहे. परंतु तात्काळ पैसे मिळवून देणारे हे पीक गेल्या हंगामात शेतकऱ्यांसाठी खूपच डोईजड ठरले आहे. गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही.
यंदा मात्र मान्सून काळात समाधानकारक असा पाऊस झालेला नसल्याने उत्पादनात घट येणार आणि यामुळे कापसाला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. विशेष म्हणजे यंदा फक्त भारतातच कापसाचे उत्पादन कमी होईल असे नाही तर जगभरातील विविध प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रांमध्ये कापसाचे उत्पादन घटणार असल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे कापसाला यंदा बऱ्यापैकी भाव मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. सध्या स्थितीला नवीन हंगामातील कापूस बाजारात येऊ लागला आहे. मात्र बाजारात कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचा बाजार मंदित पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. यंदा मात्र मुहूर्ताच्या कापसालाही चांगला भाव मिळालेला नाही. आज देखील राज्यात कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही.
कापसाला काय भाव मिळतोय ?
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज बाराशे क्विंटल कापूस आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला किमान 6900, कमाल 6,900 आणि सरासरी 6900 एवढा भाव मिळाला.
हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 24 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 6,921 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 67 क्विंटल कापूस आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला किमान 6500, कमाल 7 हजार 11 आणि सरासरी 6800 एवढा भाव मिळाला.
वरोरा-माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये 100 क्विंटल कापूस आवक झाली. त्या मार्केटमध्ये आजच्या लिलावात कापसाला 6600 रुपये किमान, 7000 रुपये कमाल आणि 6800 रुपये सरासरी भाव मिळाला.