मुंबई : काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात काश्मीरी पंडितांची थट्टा केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता या घटनेवर आदमी पार्टीने तीव्र निषेध व्यक्त केला असून आम आदमी पार्टी कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा- मेनन यांनी संगीतकार सोनू निगमला पत्र लिहून द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याची चेतावणी देत त्यांने केजरीवालांची माफी मागावी असे निवेदन देणारे पत्र दिले आहे.

त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, ‘भाजपाला ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमात रस आहे. काश्मीरी पंडितांवर अत्याचार आणि त्यांचे पलायन झाले तेव्हा केंद्रात भाजपचीच सत्ता होती. तेव्हा भाजपाने काश्मीरी पंडितांसाठी काहीच का केले नाही? परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काश्मीरी पंडितांसाठी त्यांच्या प्रचारासाठी, द्वेष पसरवण्यासाठी वापर करण्याशिवाय काहीही केले नाही. शोकांतिका ही आहे की, भाजपा चित्रपटाच्या माध्यमातून नफा मिळवण्याच्या मागे लागली आहे.’

‘हा चित्रपट खरोखरच द्वेष पसरविण्यासाठी इतिहासाचा विपर्यास करणारा एक “खोटा” चित्रपट आहे. संगीतकार सोनू निगम यांनी अरविंद केजरीवाल यांना चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला आहे. पण आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मुख्यमंत्र्यांचे काम प्रशासन करणे आहे आणि अरविंदजी ते प्रशंसनीय करत आहेत. दुसरीकडे, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमचे काम मनोरंजन करणे आहे आणि तुम्ही ते केले पाहिजे.’ अशी टीका देखील निवेदन पत्रात करण्यात आली आहे. या पत्राच्या उत्तरास सोनू निगम काय भूमिका मांडतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.