CM Eknath Shinde :(CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा अमित शहा (Amit Shaha) यांच्यासोबत चर्चा केल्याची बातमी समोर आली आहे. यामुळेच कदाचित एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे आणि शिंदे गटातील इतर नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटातील वाद अजून कायम असून, खरी शिवसेना कोणाची याचा निकाल अजून निवडणूक आयोगा समोर आहे. शिंदेनी आपला गट मजबूत करण्यासाठी राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वाळविण्यास प्रयत्न सुरु केले आहेत.

येत्या काही दिवसातच मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप गट यांची युती पाहायला मिळाली. मात्र तरीही त्यांना अपेक्षित असे यश मिळवता आले नाही .

मात्र दुसरीकडे शिंदे आणि भाजप गटाचा सामना कारण यासाठी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाने आपली कंबर कसली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडे झाले आहेत.

सध्या राज्यात (Maharashtra ) जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने मोठी खलबत सुरु आहे. विरोधी पक्षनेते आणि महा विकास आघाडीने शिंदे आणि फडणवीस सरकारला चांगलेच कचाट्यात घेरले आहे.

या घटनेचे पडसाद येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. सध्या आगामी निवडणूक आणि सरकारच्या कामकाजाबद्दल अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली असून. राज्यात सध्या बाप चोरणारी टोळी फिरतेय असा घणाघाती हल्ला केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर देत आम्हाला याचा अभिमान असल्याचे म्हंटले आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याचेही ते बोलले.