मुंबई : ‘बिग बॉस १५’ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत पाहायला मिळते. तेजस्वी प्रकाशनं बिग बॉस संपल्यानंतर लगेचच एकता कपूरच्या ‘नागिन ६’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. सध्या तेजस्वी अनेक प्रोजेक्ट करताना दिसत आहे. त्यातच आता तेजस्वी चित्रपट इंडस्ट्रीत लवकरच पाउल ठेवणार असल्याचे समोर आले आहे. तेजस्वी मराठी अभिनेता अभिनय बेर्डे यांच्यासोबत लवकरच एका मराठी सिनेमात दिसणार आहे.

याबद्दलची माहिती अभिनय याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं दिली आहे. ‘मन कस्तुरी रे’ असं या सिनेमाचं नाव आहे. दोन दिवसांपू्र्वी गुढीपाडव्याच्या दिवशी या सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं आहे. या पोस्टला अभिनयने, ‘Lockdown नंतर शूट केलेला आणि तुमच्या भेटीला येणारा माझा पहिला सिनेमा, खूप आतुरतेने ह्या सिनेमाची वाट बघत होतो, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमचं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झालंय, सिनेमा पण लवकरच तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये येईल. सगळ्यांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.’ असं सुंदर कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, या सिनेमाचं दिग्दर्शन संकेत माने करीत आहे. दिग्दर्शक म्हणून संकेतचाही हा पहिलाच सिनेमा आहे. पोस्टरवर दिसणाऱ्या अभिनय-तेजस्वीच्या फ्रेश जोडीचा लूक झकास दिसतोय. मात्र, या सिनेमाच्या थिमबद्दल अद्यापही स्पष्टिकरण आलेले नाही. पण अंदाजानुसार ही एक लव्ह स्टोरी असल्याचे म्हंटले जात आहे.