मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाच्या समर्थानात तर काहीजण विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. यावरून सोशल मीडियावर एका वादाला तोंड फुटले आहे. विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याने बोलले जात आहे. यामुळे आता विवेक अग्निहोत्री यांना गृह मंत्रालयाने Y कॅटगिरीची सुरक्षा पुरवल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयाने ही सुरक्षा विवेक अग्निहोत्री यांना दिलेली आहे. यानुसार विवेक अग्निहोत्री देशात ज्या-ज्या ठिकाणी जातील, त्या-त्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक अर्थातच CRPF चे जवान त्यांच्यासोबत असणार आहेत. Y कॅटगिरीच्या सुरक्षेमध्ये एकूण 8 सुरक्षारक्षक सेवेत असतात. यातील 5 सुरक्षारक्षक त्या व्यक्तीच्या घरी तैनात केले जातात. आता हे सुरक्षारक्षक विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेत तैनात असणार आहेत.

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 1990 साली काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांचा विस्थापनाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.