ब्रेकिंग ! दिवाळीला राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा जाणार संपावर, ‘या’ तारखेपासून सुरू करणार आमरण उपोषण
ST Employee Strike : येत्या सहा दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर दिवाळीचा सण सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र दिवाळीच्या काळात राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरतर राज्य शासनाने दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये एवढे सण अग्रीम देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळी सणाच्या पूर्वी वितरित करण्यासाठी नुकतेच राज्य शासनाने 378 कोटी रुपये एवढा निधी महामंडळाला वितरित केला आहे.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीच्या पूर्वीच होईल अशी आशा आहे. मात्र असे असले तरी एसटी कर्मचारी 7 नोव्हेंबर रोजी राजधानी मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. एसटी कर्मचारी संघटनेने याबाबतची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी मुंबईतील आधार मैदानात सात नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील एसटी कर्मचारी आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य शासन आमने-सामने येणार असल्याचे चित्र तयार होत आहे.
वास्तविक, दोन वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनकरण केले जावे या आपल्या मुख्य मागणीसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे सरकार बॅकफूटवर आले मात्र या संपामुळे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर पूर्णपणे तोडगा निघू शकला नाही.
परंतु शासनाने त्यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या 18 पैकी 16 मागण्या मान्य केल्या होत्या. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होणार नाही पण विलीनीकरण झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना जे लाभ मिळू शकतात त्यापैकी बहुतांशी लाभ शासनाकडून संबंधितांना दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते.
विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या फक्त तीन महिन्यातच पूर्ण केल्या जातील असे शासनाने सांगितले होते. यामध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे ही महत्त्वाची आणि प्रमुख मागणी होती. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यातच लागू केला जाणार होता.
पण शासनाने अजूनही सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. मान्य करण्यात आलेल्या बहुतांशी मागण्या अजूनही सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या नसल्याने आता पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन कोणते वळण घेते आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.