मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील सातव्या सामन्यात चेन्नईचा सामना लखनऊ संघाशी झाला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने फलंदाजीच्या जोरावर 210 धावांची मोठी मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने वेगवान सुरुवात केली मात्र त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी पकड घेतली. यादरम्यान, संघाचा सर्वात अनुभवी ड्वेन ब्राव्हो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
आयपीएलच्या यशस्वी संघांमध्ये समावेश असलेल्या चेन्नई संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या ब्राव्होने 15व्या हंगामात सर्वात मोठा विक्रम केला. लखनऊ संघाच्या दीपक हुड्डाला रवींद्र जडेजाने झेलबाद केल्यानंतर ब्रावो सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतील नंबर एक वर आला आहे. या विकेटसह त्याने मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज आणि चॅम्पियन गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला.
Bravoooo Legend! No. 1⃣ 👑#LSGvCSK #Yellove #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/GdgVCL6Gg2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2022
लखनऊविरुद्धच्या सामन्यावेळी मलिंगा आणि ब्राव्हो आयपीएलमध्ये 170 विकेट्स समान होते. मात्र, दीपकच्या विकेटसह, ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक 171 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. अमित मिश्रा 166 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पियुष चावलाने आयपीएलमध्ये 157 विकेट घेतल्या असून तो चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर 150 विकेट्स घेणारा महान हरभजन सिंगचा आहे.