मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या बऱ्याच काळापासून सिनेमात कमी आणि बातम्यांमध्ये जास्त झळकत आहे. कित्येक महिने शिल्पा तिच्या पती राज कुंद्राच्या पॉर्नग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होती. शिल्पाची ही अडचण संपते का नाही की, शिल्पाची आई फसवणूकीच्या प्रकरणात अडकली आहे. तिच्या आईवर एका व्यक्तीने पैसे घेऊन परत न केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.

एका व्यावसायिकानं असा आरोप केलाय की, शिल्पा शेट्टीचे वडिल सुरेंद्र शेट्टी यांना २०१७ मध्ये व्याजासह काही रक्कम त्याला परत करायची होती. पण त्यांनी ही रक्कम परत केली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर ही रक्कम परत करण्यासाठी शिल्पा शेट्टी, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी त्याला नकार दिला.

शिल्पाच्या आईला या प्रकरणात अंधेरी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. याआधी शिल्पा शेट्टी, बहिण शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांना फसवणूकी प्रकरणात समन्स बजावलं होतं. यावर आज न्यायमूर्ती ए.झेड. खान यांनी शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी विरोधात महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.

मात्र, शिल्पाच्या आईला या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. कारण ज्या कंपनीच्या व्यवहाराप्रकरणात हे कर्ज घेण्यात आले होते त्या कंपनीत शिल्पाचे वडिल सुरेंद्र शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी दोघेही भागीदार होते. यात शिल्पा-शमिता भागीदार असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्यानं या कर्जाशी त्यांचा काही संबंध नाही हे स्पष्ट झालं आहे, असं न्यायालयानं सांगितलंय.