मुंबई : भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अनेक वीर पुरुषांवर बॉलीवूड इंडस्ट्रीत सिनेमे तयार झाले आहेत. यातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही लढा लवकरच आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सावरकरांची भूमिका दुसरा तिसरा कोणी नाहीतर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता रणदीप हुड्डा साकारणार आहे.

निर्माते संदीप सिंह पुन्हा एकदा अभिनेता रणदीप हुड्डासोबत त्यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. या आधी संदीप आणि रणदीप यांनी ‘सरबजीत’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात प्रचंड पसंती मिळाली आहे.

दरम्यान, ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचं शूटिंग या वर्षी जून 2022 पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण केलं जाणार आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकणार आहे. वीर सावरकरांच्या या कधीही न समोर आलेल्या कथेचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत.