मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. पोलीसात भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यां मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी आली आहे. पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.

तसेच, पोलीस भरती 2019 मधील पदांशिवाय 7 हजार 231 पदांवर पोलीस भरतीही करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अधिवेशनादरम्यान केली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यांच्या इमारतीची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामधील 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्य राखीव दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्यासाठी 15 वर्षांची अट होती. ही अट आता 12 वर्षांवर केली असल्याचंही गृहमंत्री म्हणाले. तर गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात 120 ते 150 दिवस काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवल्याची माहिती वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.