मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायम कोणाशी ना कोणाशी पंगा घेत असते. काही दिवसांपूर्वी कंगणाने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तरसोबत पंगा घेतला होता. मात्र यामुळे कंगणाच्या अडचणी वाढल्या होत्या. कारण जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. हा दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावा यासाठी कंगनाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मात्र, न्यायालयाने कंगनाचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. एखादे न्यायालय फौजदारी न्याय नि:ष्पक्षपणे किंवा वस्तुनिष्ठपणे करू शकत नसल्याचे दिसून आले तर तो खटला वर्ग केला जाऊ शकतो. सदर प्रकरणी न्याय मिळणार नाही या भीतीमुळे खटला वर्ग केला जाऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने कंगनाचा अर्ज फेटाळला.

जेव्हा लोकांचा खटल्याच्या नि:ष्पक्षतेवर विश्वास कमी होईल तेव्हा कोणताही पक्ष खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करू शकतो. मात्र, खटला योग्य निष्पक्षपणे चालवला जाणार नाही, ही भीती वाजवी व अनुमानावर आधारित असली पाहिजे. काल्पनिक व तर्कसंगत नाही, असं म्हणत न्यायालयाने कंगनाला फटकारलं आहे.