मुंबई : सलमान खान काळवीट शिकार प्रकरण तर संपूर्ण जगाला माहीत आहे. गेली कित्येक वर्ष झाली या प्रकरणावर सुनावणी होत होती. दरम्यान, या प्रकरणात आता राजस्थान उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. यात न्यायालयाने सलमान खानला मोठा दिलासा दिला असून, सलमान खानशी संबंधित सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने दिले आहेत.

1998 मध्ये राजस्थानमध्ये सलमान खानने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार केली होती. त्यानंतर त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सलमानला 6 दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते. त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावे लागले होते.

सलमान खानविरोधात शस्त्रास्त्र कायदा, 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान खानचा शस्त्रास्त्र परवाना संपला तेव्हा त्याने अग्निशस्त्राचा वापर केला असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, सलमान खानसोबत या प्रकरणात अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.