मुंबई : मुंबईत दर दिवशी मारहाण झाल्याची घटना समोर येत आहेत. त्यातच आता अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या संदर्भात नुकतीच एक अशीच बातमी समोर आली आहे. निवेदिता यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आली आहे.

‘विलेपार्ले येथून घरी परतत असताना रात्री १०. ३० च्या सुमारास लाल सिग्नल लागल्यावर रस्त्यावर थांबलो असता, मागून संबंधित सेडान चालकाने धडक दिली,’ अशी माहिती अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोलिसांना दिली आहे.

रविवारी झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या वाहन चालकाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे.