मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान बऱ्याच दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी आमिरने किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. तेव्हपासून आमिर सतत चर्चेत असतो. दरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरने हा १५ वर्षांचा संसार का मोडला? यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या घटस्फोटावर भाष्य करताना आमिर म्हणाला, ‘ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिनं मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी तिची इच्छा अजिबात नाही. कारण मी जर बदललो तर तो व्यक्ती राहणार नाही ज्या व्यक्तीवर तिनं प्रेम केलं होतं. असं तिचं म्हणणं होतं. तिचं माझ्या बुद्धीवर आणि व्यक्तीमत्त्वावर प्रेम होतं त्यामुळे मी कधी स्वतःला बदलावं अशी अपेक्षा तिने कधीच केली नाही.

आमिर पुढे म्हणाला, ‘पण जेव्हा किरणनं मला ७ वर्षांपूर्वी सांगितलेल्या काही गोष्टींवर जेव्हा मी आज विचार करतो तेव्हा मी एक सांगेन की मागच्या ६-७ महिन्यांमध्ये मी स्वतःमध्ये बरेच बदल होताना पाहिले आहेत. किरणजी आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा आणि आदर आहे. कारण जेव्हा एक विवाहित जोडपं वेगळं होतं तेव्हा त्यांच्यामध्ये असं बॉन्डिंग पाहायला मिळत नाही जे आज आमच्यात आहे. आमच्या घटस्फोटानंतर माझं फातिमा सना शेखशी अफेअर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. माझं तेव्हाही कोणाशी अफेअर नव्हतं आणि आताही मी कोणत्याही व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नाही.’ असं आमिर म्हणाला.

दरम्यान, आमिर खाननं पहिली पत्नी रिना दत्तापासून २००२ साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ३ वर्षांनी २००५ साली त्यानं किरण रावशी लग्न केलं. आमिर आणि किरण यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २०११ साली या दोघांचा मुलगा आझादचा जन्म झाला. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.