मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाला देश-विदेशात चांगलीच पसंती मिळाली. हा चित्रपट अजून पाहिला नसेल असा क्वचितच कोणी उरला असेल. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गायक सोनू निगमने अद्याप ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिलेला नाही. याबद्दल स्वतः सोनू निगमने वक्तव्य केले आहे. सोनू निगमचे हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सोनू निगमला काश्मीर फाईल्सच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला “आजपर्यंत मी काश्मीर फाईल्स पाहिल्या नाही, यामागे दोन कारणे आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी दुबईत होतो आणि हा चित्रपट दुबईत प्रदर्शित झाला नव्हता. यामुळे हा चित्रपट मी पाहिला नाही”
सोनू निगम पुढे म्हणाला की, “मी येथे आलो तेव्हापासून हा चित्रपट पाहण्याचे धाडस माझ्यात होत नाहीये. जशा प्रतिक्रिया येत आहेत आणि मी पाहतोय, लोक रडत आहेत. मी आतून रडत आहे. अशा सर्व गुन्ह्यांबाबत मी संवेदनशील आहे. 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर बनलेल्या या चित्रपटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. आता हा केवळ चित्रपट राहिला नसून ती सर्वसामान्यांची भावना बनली आहे. या संवेदनशील गोष्टी बघण्याचे मला धाडस होत नाहीये म्हणून अजूनही मी चित्रपट पाहायला गेलो नाही,” असेही सोनू निगम म्हणला.