नवी दिल्ली : IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होत असून जगभरातील चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ही बहुप्रतिक्षित लीग सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, बीसीसीआयने म्हटले आहे की, जर खेळाडूंच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा मॅच अधिकाऱ्यानेही प्रोटोकॉलचे उल्लंघन केले तर त्या खेळाडूला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
नवीन नियमांनुसार, एखाद्या संघाने जाणूनबुजून एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला संघाच्या बबलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिल्यास, त्याला 1 कोटी रुपयांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि समजा अजून एकदा नियमांचे उल्लंघन केले तर संघाच्या टॅलीमधून एक किंवा दोन गुण वजा केले जाऊ शकतात.
याबद्दल माहिती देताना, बीसीसीआयने सांगितले की, “कोविड-19 मुळे खेळाडूंच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने या ऑपरेटिंग नियमांच्या अधीन असलेले सहकार्य, वचनबद्धता आणि पालन करणे महत्वाचे आहे.”
बीसीसीआयनेही पुढे जाऊन नियमांचे पालन न केल्यास काय होईल, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. जर एखाद्या खेळाडूने प्रथमच बबलचे नियम मोडले, तर तो खेळाडू पुन्हा एकदा सात दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये जाईल, आणि तो जितक्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे त्यासाठी त्याला पैसे दिले जाणार नाहीत.
यानंतर, जर एखाद्या खेळाडूने दुसऱ्यांदा नियम मोडला, तर त्या खेळाडूला एका सामन्यासाठी निलंबित केले जाईल आणि त्याला त्या सामन्यासाठी कोणतेही वेतन मिळणार नाही. आणि जर हा गुन्हा तिसऱ्यांदा केला गेला तर खेळाडूला संघातून काढून टाकले जाईल आणि नंतर फ्रेंचायझी बदलीची मागणी करू शकणार नाही.