नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने दर दोन वर्षांनी खेळल्या जाणाऱ्या आशिया कप स्पर्धेची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी ही विशेष स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार असून भारतीय संघाला टी-20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे, ज्याची भारतीय चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.
आशियाई क्रिकेट परिषदेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या स्पर्धेची माहिती दिली आहे. त्यानुसार आशिया कप 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत श्रीलंकेत आयोजित केला जाईल, तर स्पर्धेसाठी पात्रता सामने 20 ऑगस्टपासून खेळवले जातील. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि अन्य एक संघ भाग घेणार आहेत.
क्वालिफायर फेरी जिंकणाऱ्या संघाचा सहावा संघ म्हणून आशिया कपमध्ये समावेश केला जाईल. क्वालिफायर सामने यूएई, कुवेत, हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहेत. विशेष म्हणजे आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते, परंतु 2020 मध्ये कोविडमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाबद्दल बोलायचे झाले तर, भारत आशिया चषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर मागील दोन वेळा (2016 आणि 2018) विजेते देखील भारतच होते. भारतानंतर श्रीलंकेच्या संघाने पाचवेळा तर पाकिस्तान संघाने दोनदा विजेतेपद पटकावले आहे.