Anil Ambani
Anil Ambani

अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी विकत घेण्यासाठी इंडस्ट्रीतील बडे चेहरे पुढे आले आहेत. अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटलला विकत घेण्यासाठी एकूण 54 कंपन्यांनी बोली लावली आहे.

खरेदीदारांच्या यादीत अदानी फिनसर्व्ह (Adani Finserv), केकेआर, पिरामल फायनान्स, पूनावाला फायनान्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, टाटा एआयजी, एचडीएफसी एर्गो आणि निप्पॉन लाइफ इन्शुरन्सचा समावेश आहे. या कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) लिमिटेडच्या अधिग्रहणात रस दाखवला आहे. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड ही अनिल अंबानी यांची प्रवर्तित कंपनी आहे.

अनेक बँका देखील खरेदीदार –
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर बोलीदारांमध्ये येस बँक (Yes Bank), बंधन फायनान्शियल होल्डिंग्ज, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, ओक ट्री कॅपिटल, ब्लॅकस्टोन, ब्रुकफील्ड आणि टीपीजी यांचा समावेश आहे.

तसेच, रिलायन्स कॅपिटलसाठी EoI सबमिट केलेल्या इतर कंपन्यांमध्ये ArpWood, Varde Partners, JC Flowers, Oaktree, Apollo Global, Blackstone आणि Hero Fincorp यांचा समावेश आहे.

यापूर्वी रिलायन्स कॅपिटलसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख 11 मार्च होती, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने 25 मार्चपर्यंत वाढवली होती. वास्तविक अधिक बोली मिळाल्याने रिलायन्स कॅपिटलला चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा आहे. कारण टेकओव्हरच्या शर्यतीत गौतम अदानीसह अनेक मोठे खेळाडू आहेत.

बहुतेक कंपन्यांना पूर्ण भागभांडवल हवे असते –
अहवालानुसार बहुतेक बोलीदारांनी रिलायन्स कॅपिटलच्या पूर्ण अधिग्रहणासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) दिली आहे. उर्वरित काही कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटलच्या एक किंवा दोन उपकंपन्यांसाठी बोली लावली आहे. बोली लावणाऱ्यांकडे दोन पर्याय होते. त्यांना हवे असल्यास, ते संपूर्ण RCL साठी बोली लावू शकतात किंवा NBFC कंपनीपैकी एका उपकंपनीसाठी तसे करू शकतात.

रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी NSE वर रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 2.88 टक्क्यांनी वाढून 14.30 रुपयांवर बंद झाले. सोमवारीही या शेअरमध्ये हालचाल होऊ शकते.

उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी RBI ने रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ पेमेंट डिफॉल्ट आणि व्यवसाय चालवण्याच्या मुद्द्यांवरून बरखास्त केले होते. ही तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-banking financial company) आहे जिच्याविरुद्ध मध्यवर्ती बँकेने दिवाळखोरी संहितेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे.