हैदराबाद: सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत अभिनेता धनुषसोबत झालेल्या घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत पाहायला मिळत आहे. दरम्यान, ऐश्वर्या संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे. ती लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असून तिने याची तयारीही पूर्ण केली आहे.

ऐश्वर्या रजनीकांतने दिग्दर्शक आणि गायिका म्हणून साऊथ इंडस्ट्रीत चांगलाच ठसा उमटवला आहे. साऊथ इंडस्ट्रीत आपली ताकद दाखवल्यानंतर ती आता हिंदी चित्रपटांमध्ये काहीतरी नवीन करताना दिसणार आहे. वृत्तानुसार, धनुषची माजी पत्नी ऐश्वर्या रजनीकांत ‘ओ साथी चल’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

‘ओ साथी चल’ची निर्मिती मीनू अरोरा यांनी केली आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असेल. चित्रपटाच्या निर्मात्याने यावर अधिक बोलण्यास नकार दिला कारण चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप पूर्ण झाली नाही.

दरम्यान, 17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्या यांनी ते दोघंही एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. याची माहिती या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. जवळपास 18 वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले आहेत. या घटस्फोटा मुळे धनुष च्या चाहत्यांना धक्काच बसला होता. दरम्यान, आता ऐश्वर्या आणि धनुष हळूहळू आपल्या कामावर परतत आहेत.