कापूस अन सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर का मिळतोय ? दरात घसरण होण्याचे कारण काय, पहा…..
Agriculture News : कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रात उत्पादित होणारी दोन महत्त्वाची पिके. या दोन्ही पिकांना कॅश क्रॉप अर्थातच नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. तात्काळ पैसे मिळतात म्हणून या पिकाला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरली होती. गेल्या वर्षी कापसाला आणि सोयाबीनला खूपच कमी भाव मिळाला होता. यामुळे शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
दरम्यान या चालू खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहे. मात्र चालू खरीप हंगामातील नवीन कापूस आणि सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. यामुळे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारभावात मोठी घसरण झाली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. खरंतर उद्यापासून अर्थातच 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.
घटस्थापना झाल्यानंतर पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. 24 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी हा नवरात्र उत्सव समाप्त होणार आहे. दरम्यान या नवरात्र उत्सवाच्या ऐन तोंडावरच सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावात घसरण झाली असल्याने शेतकरी खूप नाराज आहेत. सणासुदीच्या काळात सोन्यासारख्या मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने पुन्हा एकदा बळीराजाला संकटात सापडला आहे.
खरंतर केंद्र शासनाने सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी हमीभाव जाहीर केले आहेत. सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव, एम एस पी जाहीर करण्यात आली आहे. मध्यम धाग्याच्या कापसाला 6,640 तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार 20 रुपये एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र सध्या मालाला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सध्या सोयाबीन राज्यातील प्रमुख बाजारात 3800 ते 4500 दरम्यान विकला जात आहे.
म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत आहे. विशेष म्हणजे काल नागपूर एपीएमसी मध्ये सोयाबीनला फक्त 3200 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. कापसाचा विचार केला असता सध्या कापसाची बाजार समितीमध्ये आवक होत नसून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करत आहेत. खेडा खरेदीला खेडोपाडी सुरुवात झाली आहे.
या खाजगी खरेदीमध्ये कापसाला 5000 ते साडेसहा हजार पर्यंतचा दर मिळत आहे. वाळलेला कापूस सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खरेदी केला जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी सध्या बाजारात येत असलेला सोयाबीन ओला असून यामध्ये आद्रता अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे सांगितले आहे.
तर काही व्यापाऱ्यांनी सोयाबीन पिकावर मध्यंतरी आलेल्या येलो मोजक रोगामुळे सोयाबीनची कॉलिटी खराब झाली असून मालाला कॉलिटीनुसार भाव मिळत असल्याचे सांगितले आहे. कापसाच्या बाबतीतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान बाजारात चांगल्या दर्जाचा माल आल्यानंतर बाजारभावात वाढ होईल असे काही तज्ञ सांगत आहेत.