Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव, वाचा सविस्तर

0

Agriculture News : दिवाळीच्या काळात राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या वेगवेगळ्या काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा राज्यातील बाजार समित्या शेतमालाच्या लिलावासाठी सुरू झाल्या आहेत.

मात्र दिवाळीनंतर काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव थोडे कमी झाले आहेत. राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे कमाल बाजार भाव 3500 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

सरासरी बाजार भाव देखील ₹2000 प्रतिक्विंटल पर्यंत खाली आले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची चिंता वाढू लागली आहे. कांद्याचे बाजारभाव आणखी पडणार का अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला विक्रमी दर मिळत होता. याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात देखील कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

त्यामुळे केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील जवळपास दोन लाख मेट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या दरात विकण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले किमान निर्यात मूल्य 400 डॉलर प्रति टन वरून वाढवून 800 डॉलर प्रति टन एवढे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. परिणामी कांद्याची निर्यात मंदावली.

या दोन्ही निर्णयामुळे देशांतर्गत मुबलक कांदा उपलब्ध झाला आहे.बफर स्टॉक मधील कांदा फक्त 25 रुपये प्रति किलो या दरात विकला जात असल्याने कांद्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

घाऊक बाजारात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पण याचा आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र असे असले तरी आज राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे.

या मार्केटमध्ये आज कांदा तब्बल 5500 रुपये प्रति क्विंटल या कमाल बाजारभावात विकला गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये आज 420 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.

आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार सातशे, कमाल 5500 आणि सरासरी 3600 एवढा भाव मिळाला आहे. मात्र राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे भाव किंचित कमी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.