rohit sharma
After the defeat against Rajasthan, Rohit said, "... this is just the beginning of the competition."

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सची आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात झाली आणि सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल 2022 च्या 9व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध 23 धावांनी पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 170 धावा करता आल्या. सलग दुसरा सामना गमावल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला आहे. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माने पराभवाचे कारणही सांगितले आहे.

रोहित म्हणाला, “शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 194 धावांचे लक्ष्य पार करायला हवे होते.” मुंबईच्या संघाला 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि यादरम्यान दुखापतग्रस्त वरिष्ठ फलंदाज सूर्यकुमार यादवची अनुपस्थिती स्पष्टपणे दिसून आली.

रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबद्दल सांगितले की, “जोपर्यंत तो हाताच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला या सामन्यात खेळवून आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही.”

रोहित पुढे म्हणाला, “राजस्थानने चांगली फलंदाजी करताना 193 धावा केल्या आणि जोस बटलरने शानदार खेळी केली. त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, पण यश मिळालं नाही. मला वाटतं या खेळपट्टीवर १९३ धावा जिंकायला हव्या होत्या, खासकरून जेव्हा सात षटकात 70 धावांची गरज असते. पण अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि ही फक्त स्पर्धेची सुरुवात आहे त्यामुळे आम्ही त्यातून शिकू शकतो.”

सामन्याच्या सकारात्मक पैलूंबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “बुमराहने तसेच मिल्सने चांगली गोलंदाजी केली. याशिवाय तीलक शर्मा आणि इशान किशन यांची फलंदाजी उत्कृष्ट होती. मला वाटतं या दोघांनी शेवटपर्यंत फलंदाजी केली असती तर फरक निर्माण झाला असता आणि आम्ही जिंकू शकलो असतो. त्यांचे बाद होणे संघासाठी निराशाजनक होते.”

त्याचबरोबर सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो तंदुरुस्त झाल्यावर संघासोबत जोडला जाईल पण त्याने बोटाच्या दुखापतीतून पूर्ण बरा व्हावा, अशी आमची इच्छा आहे.”