नवी दिल्ली : लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने पाकिस्तान संघाची चांगलीच शाळा घेतली आहे.
लाहोर कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 115 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. 351 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी 235 धावांवर गारद झाला. नॅथन लायनने गोलंदाजी करताना 5 बळी घेतले.
या पराभवानंतर शोएब अख्तरने पाकिस्तानी संघावर जोरदार टीका केली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो म्हणाला, “अतिशय निराशाजनक मालिका होती. जेव्हा तुम्ही बचावात्मक भूमिका घेता तेव्हा समान परिणाम येतो. फारच फालतू मालिका होती. ही ऐतिहासिक मालिका अनिर्णित राहावी, असा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न होता पण त्याचे श्रेय ऑस्ट्रेलियन संघाला जाते. त्यांना पाहून मन प्रसन्न झाले. ऑस्ट्रेलियाचा हा संघ यापूर्वी कधीच पाकिस्तानात आला नव्हता, मात्र असे असतानाही त्यांनी येथे येऊन धैर्याने खेळ केला. ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांनंतर आला होता आणि तुम्ही त्यांना चांगल्या विकेट्स द्याल अशी अपेक्षा होती पण पाकिस्तानने तसे केले नाही. पीसीबीने सांगितले की, आम्ही त्यांना थकवत आहोत, पण तुम्हाला थकवून ते निघून गेले.”
आता या दोन्ही देशांदरम्यान मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार नाहीत.