मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वीच काळवीट हत्या प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला होता. मात्र, हे प्रकरण संपते का नाही तर सलमान पुन्हा एका अडचणीत सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी सलमान सायकल राईड करीत असताना एका पत्रकाराने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे सलमानने त्या पत्रकाराला मारहाण केली होती. असा त्या पत्रकाराने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सलमान खानला कोर्टाने समन्स बजावले आहे. यानंतर सलमानने या प्रकरणात काहीही वक्तव्य केले नसले तरी त्याची मानलेली बहीण ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिने यात उडी मारत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानला राखी सावंत भाऊ मानते हे आपल्याला माहीतच आहे. यामुळे आपल्या भावाची पाठराखण करायला राखी आता पुढे आली आहे. नुकतंच राखीला मीडियाने सलमानला समन्स बजावल्या विषयी काही प्रश्न केले. यावर राखी म्हणाली, ‘कोणताही मीडिया कधीच वाईट नसतो, परंतु जेव्हा तुम्ही मोठे स्टार होता तेव्हा काही प्रश्न तुम्हाला त्रास देतात. सलमानचे सिनेमे सुपरहिट आहेत, त्याचे लाखो चाहते आहेत पण कुठेतरी त्याला जीवनाचा आनंद मिळाला नाही. मला वाटते की त्याला सर्व काही मिळाले आहे, परंतु त्याने बरेच काही गमावलेही. जर तुम्ही एखाद्याची दुखरी नस दाबली तर त्याचे चिडणे स्वाभाविक आहे. तोही माणूस आहे.”

“तुम्हाला माहीत नाही पण सलमान नेहमीच तणावात असतो. जेव्हा त्याचे सिनेमे रिलीज होतात तेव्हा त्याला चाहत्यांसमोर येण्याची इच्छा नसते. जर कोणी चुकीचा प्रश्न विचारला तर त्याला राग येऊ शकतो, तो सच्चा माणूस आहे म्हणून त्याने जर काही बोलले असेल तर लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे मला वाटत नाही.” असं म्हणत राखीने सलमानला आपला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, पत्रकार मारहाण प्रकरणात 5 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.