पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच नसली तरी आता हळूहळू इंधनाची दरवाढ सुरू झाली आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलमध्ये काही पैशांची वाढ झाली.

त्यानंतर आज स्वयंपाकाचा गॅस तब्बल पन्नास रुपयांनी महागला आहे. आज मंगळवारपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८३ पैशांनी वाढ झाली.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ११२ डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. त्याहून अधिक भडका घरगुती गॅस सिलेंडरच्या दराचा झाला आहे.

त्यामध्ये ५० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली.

निवडणुकीनंतर लगेच वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकरानं काही काळ थांबून आणि राज्यांत मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यावर ही वाढ करण्यास सुरवात केल्याचे दिसून येते.