मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांना काही दिवसांपूर्वी 21 लाख रुपये फसवणूक प्रकरणात अंधेरी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणात आज सुनावणी झाली असून सुनंदा शेट्टी यांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने सुनंदा यांना जामीन दिला असून त्यांच्या विरोधातील जामिनपात्र वॉरंटसुद्धा रद्द केल आहे.
ऑटोमोबाईल एजन्सीचे मालक पार्शद फिरोज आमरा यांनी आरोप केला होता की, त्यांनी कॉर्गिफ्ट्स या शेट्टी कुटुंबातील कंपनीला 21 लाख रुपये कर्ज दिलं होतं. जानेवारी 2017 पर्यंत त्यांना व्याजासह या कर्जाची परतफेड करायची होती. शिल्पाच्या वडिलांनी वार्षिक 18 टक्के व्याजाने हे कर्ज घेतलं होतं. या कर्जाबद्दलची माहिती त्यांनी मुली आणि पत्नीला दिली होती, असा दावा फिर्यादीने केला होता.
मात्र कर्ज फेडण्यापूर्वीच 2016 मध्ये शिल्पाच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शिल्पा, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी कर्ज फेडण्यास नकार दिला, असा आरोप फिर्यादीने केला होता. यानंतर शिल्पा शेट्टी, सुनंदा शेट्टी आणि शमीता शेट्टी यांच्यावर फिर्यादीने आरोप केला होता. या प्रकरणाच्या मागच्या सुनावणीत न्यायालयाने शिल्पा आणि शमीता यांची निर्दोश म्हणून सुटका केली होती. मात्र, सुनंदा शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.