मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. मात्र या चित्रपटामुळे दोन गट पडलेले दिसत आहेत. एक चित्रपटाच्या समर्थनात तर दुसरा चित्रपटाच्या विरोधात. चित्रपट समाज्यात वाद पेडवत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान या वादात आता दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी उडी मारत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत काही ट्वीट केले आहेत. ज्यात एक व्हिडीओचाही समावेश आहे. जो चित्रपट संपल्यानंतर थिएटरमधील परिस्थिती दाखवत आहे. ज्यात बरेच लोक मोठ्या आवेशात मुस्लीम लोकांच्या विरोधात टीका करताना दिसत आहेत आणि अखेर ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘कश्मीर फाइल्स हे घाव भरून काढण्याचं काम आहे? की या चित्रपटातून लोकांमध्ये फक्त तिरस्काराचं बीज रोवलं जातंय? की आणखी घाव दिले जात आहेत?. मी फक्त विचारत आहे.’ असं प्रकाश यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी दिल्लीतील दंगे, गोध्रा केस आणि नोटबंदी अशा प्रकारच्या फाइल्सवरही चित्रपट येतील का? असा प्रश्न विचारला आहे. प्रकाश राज यांच्या मते, देशातील हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये या चित्रपटातून फूट पाडली जात आहे. दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर अभिनेत्री स्वरा भास्कर, गौहर खान अश्या अनेक सेलिब्रिटींनि आक्षेप घेतला आहे.