नवी दिल्ली : आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. कोरोनाच्या काळात तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली कनिका वयाच्या 43व्या वर्षी पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. मे महिन्यात कनिका लग्न करणार असल्याचे वृत्त आहे.
कनिका कपूर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रियकरामुळे चर्चेत आली होती. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. कनिका कपूरच्या प्रियकराचे नाव गौतम असे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूर आणि गौतम दोघेही या वर्षी मे महिन्यात त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. गौतम हा लंडनचा रहिवासी आहे, त्यामुळे त्यांच्या लग्नाचे सर्व फंक्शन्स लंडनमध्येच होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघेही त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अद्याप कनिकाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कनिकाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने एनआरआय उद्योगपती राज चांडौकसोबत लग्न केले होते. पण दोघांनी 2012 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनाही तीन मुले आहेत.